अयोध्येतील रामलल्लासाठी 7 दिवस 7 अनोखे पोशाख, श्रीरामाचं अंगवस्त्र बनवण्याचा मान कुणाला?
अयोध्येतील राममंदिरात विराजमान होणाऱ्या रामलल्लांचे अंगवस्त्र तयार करण्याचं काम ही सुरू आहे. तर अयोध्येतील श्रीरामांचं अंगवस्त्र बनवण्याचा मान कुणाला मिळणार याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. याबद्दलची माहिती आता समोर आली आहे.
अयोध्या, २ जानेवारी २०२४ : अयोध्येतील रामलल्लाच्या भव्य मंदिराचं उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी समस्त हिंदू उत्सुक असून या दिवसाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या कार्यक्रमासाठी अयोध्येत दिवस रात्र एक करून जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये विशेष म्हणजे अयोध्येतील राममंदिरात विराजमान होणाऱ्या रामलल्लांचे अंगवस्त्र तयार करण्याचं काम ही सुरू आहे. तर अयोध्येतील श्रीरामांचं अंगवस्त्र बनवण्याचा मान कुणाला मिळणार याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. याबद्दलची माहिती आता समोर आली आहे. अयोध्येतील टेलर भागवत पहाडी यांच्यावर या रामलल्लाच्या मूर्तीला खास पोशाख शिवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रामलल्लासाठी ७ रंगाचे पोशाख बनवले जाणार आहे. नवीन मुर्तीसाठी अजून पोशाख शिवलेला नाही, मात्र मंदिर ट्रस्टकडून निर्णय कळवल्यावर अनोखा आणि खास पोशाख तयार केला जाणार आहे.