मनोज जरांगे यांची मागणी सरकार मान्य करणार? दबावाला बळी पडू नका म्हणत बबनराव तायवाडे यांचा विरोध कायम
tv9 Marathi Special Report | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. मराठे कुणबीच असून विदर्भात मराठे कुणबी यांना ओबासीतून आरक्षण आहे. त्यामुळं आम्हालाही कुणबीचे दाखले द्या, असं जरांगे पाटलांचं मत आहे. पण ओबीसी नेत्यांपासून ते ओबीसी महासंघानंही विरोधच केला आहे.
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | जरांगेंच्या मागणीला सर्वातआधी ओबीसी महासंघाकडून विरोध झाला. आता जरांगेंची मुदत एक दिवसावर आल्यानं पुन्हा बबनराव तायवाडेंनी सरकारला इशारा दिला. जरांगेंच्या दबावाला बळी पडले तर, रस्त्यावर उतरु असं ओबीसी महासंघानं म्हटलंय. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि कुणबी दाखल्यांची मागणी केली. तेव्हापासूनच जरांगेंना ओबीसी नेते आणि ओबीसी महासंघाचा विरोध सुरु झाला. जरांगेंची मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले द्या. अर्थात ओबीसीतून आरक्षण. मात्र, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडेंनी सरसकट मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्यास विरोध आहे. ओबीसी नेते भुजबळांनीही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला आहे. विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी म्हणणंय की, मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीतून नको, एवढंच नाही तर ओबीसी महासंघाला सरकारनं पत्र देऊन वायदा केला की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. त्यामुळे सरकार आता कोणता निर्णय घेणार?