‘त्यांना दादा समजत होतो, मात्र त्यांची दादागिरी संपली’, बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी ६ कोटी रूपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे. या मोठ्या खर्चावरून आणि दिव्यांगाचे पगार मिळाले नाही, यावरून बच्चू कडू यांनी निशाणा साधला आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आज लाडकी बहीण योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी ६ कोटी इतका मोठा खर्च करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्यासोबत आदिती तटकरे आणि धनंजय मुंडे देखील हजेरी लावणार आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर करण्यात आलेल्या मोठ्या खर्चावरून प्रहार संघटनेचे नेते आमि मंत्री बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. ‘दिव्यांगांचे तीन महिन्यापासून पैसे मिळाले नाही, अजित दादा सभागृहात जोराने बोलत होते, आम्ही त्यांना दादा समजत होतो, मात्र त्यांची दादागिरी संपली’, असे बच्चू कडू म्हणाले. तर दिव्यांगांचे पगार जर पाच तारखेला भेटले नाही तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवेलं असं अजितदादांनी म्हटलं होतं, पण पगार झाले नाही. मंत्र्याच्या शब्दाला काहीच किंमत नाही.. प्रशासनच सर्व काही आहे हे स्पष्ट होते, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तुम्ही जर दिव्यांगांचे पैसे तीन महिन्यांपासून देत नसाल तर यापेक्षा महापाप कोणतच नसेल, असे म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवरच निशाणा साधला आहे.