Bachchu Kadu : ‘… त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं’, बच्चू कडू यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रिपदाची मागणी केली आहे. मात्र महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार देण्यात आला आहे. यासंदर्भात काय म्हणाले बच्चू कडू?
दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रिपदाची मागणी केली आहे. मात्र महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार देण्यात आला आहे. तर या बदल्यात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदासह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आता राज्यातील उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर स्वीकारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. यासंदर्भात प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांना सवाल केला असता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. ‘एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवले हेच मोठे झाले’, असा खोचक टोला लगावत बच्चू कडू यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पुढे बच्चू कडू असेही म्हणाले की, एकनाथ शिंदे हे राज्यातच असतील ते केंद्रात जाणार नाहीत. भाजपा त्यांना गृहमंत्री पद देणार नाही, असे म्हणत भाजपाने त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं झाले. भाजपाने तेवढी तरी जाणीव ठेवली आहे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.