पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजीचे रील, व्हिडिओ केले
गोंदिया जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पाहणीसाठी गेलेल्या काँग्रेस खासदारांच्या व्हिडीओनंतर आता भाजप आमदाराचा स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आला आहे. खासदाराची चारचाकी वाहनावर तर आमदाराची चक्क ट्रॅक्टरवर बसून स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपचे तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांचा देखील एक स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आला आहे. मागील तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या घरातील जीवनापयोगी साहित्य पुरात वाहून गेले आहे. याच नुकसानीची पाहणी करायला गेलेले खासदार प्रशांत पडोळे यांनी कारच्या बोनटवर बसून स्टंटबाजी केली होती. हा प्रकरण ताजा असतानाच तिरोडा गोरेगाव विधानसभेचे भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांनी चक्क ट्रॅक्टरवर बसून व्हिडिओ बनवला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होताना दिसत आहे. तर लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त नागरिकांना सांत्वन करण्याकरिता जातात की त्यांची थट्टा करायला जातात हा प्रश्न या निमित्ताने अधोरेखित झाला आहे.