विधासभेसाठी भाजपचे 99 अन् शिंदेंचे 45 उमेदवार जाहीर, पण महायुतीत ‘या’ 18 जागांवर पेच कायम
भाजपच्या पहिल्या यादीमध्ये तब्बल ९९ उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा तर शिंदेंच्या शिवसेनेकडून ४५ जणांना उमेदवारी.. असे असताना मात्र महायुतीमध्ये अद्याप १८ जागांवर पेच कायम असल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या रविवारी भारतीय जनता पक्षाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीमध्ये तब्बल ९९ उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. तर काल मंगळवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, अजित पवार गटाकडून काही उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानंतर अजित पवार गट राष्ट्रवादीकडून ३८ उमेदवारांची पहिली यादी अधिकृतरित्या आज जाहीर करण्यात आली. असे असताना मात्र महायुतीमध्ये अद्याप १८ जागांवर पेच कायम असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान बंड शमवण्यासाठी काही जागा जाहीर करण्यास सावध पवित्रा घेतला जात आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरल्यानंतर महायुतील आपला उमेदवार देणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये अंधेरी पूर्व, चेंबूर, दिंडोशी, कलिना, वरळी, वर्सोवा, शिवडी, धारावी, मिरा भाईंदर, कोल्हापूर उत्तर, गुहागर, करमाळा, बार्शी, कोपरगाव, गंगाखेड, लोहा, बडनेरा आणि बाळापूर या जागांवर पेच कायम आहे.