Vinod Tawde Diary : तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूर यांनी दाखवलेल्या ‘त्या’ डायरीत नेमकं काय?
भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आहे. पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजपा आणि बाविआमध्ये नालासोपाऱ्यात तुफान राडा झाला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान उद्या पार पडणार आहे. मात्र यापूर्वीच नालासोपारा येथे मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदानासाठी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विरारच्या विवांत हॉटेलमध्ये घेरलं आहे. यावेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यानतंर माध्यमांसमोर वसई-विराराचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना त्यांनी विनोद तावडेंच्या सोबत असणाऱ्या डायऱ्याच थेट ठाकूर यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यावर दाखवल्यात. पाच कोटीच वाटप चालू आहे. मला डायऱ्या मिळाल्या आहेत. लॅपटॉप आहे. कुठे-काय वाटप झालय त्याची माहिती आहे, असा दावा करत ‘वसई रोड 5, वसई पश्चिम 4 असा त्या डायरीत उल्लेख आहे. 4 वाजता कुठे पैसे पोहोचवायचे हे सर्व त्यात लिहिलय’, असं त्यांनी सांगितलं. तसेच विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर नियमानुसार इलेक्शन अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अन्यथा उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यत ते माझ्यासोबतच इथे राहतील. मी त्यांना एकांतात भेटणार नाही. त्यांनी लोकांसमोर येऊन बोलावं” असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.