हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतरही… फडणवीसांनी कोणाबद्दल केलं वक्तव्य?
'महादेवराव जानकर हे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहेत. माझ्यासोबत पाच वर्ष मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलं. कूरकूर नाही, कुरबूर नाही. सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटाने करायचं. सामान्य माणसाकरता काम करायचं. अरे पाच वर्षात 1 रुपयांचा डाग देखील....', फडणवीसांनी केलं कौतुक
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आज परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने परभणीत महायुतीकडून सभेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर असताना त्यांनी महादेव जानकर यांचं कौतुक केलं. “महादेवराव जानकर हे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहेत. माझ्यासोबत पाच वर्ष मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलं. कूरकूर नाही, कुरबूर नाही. सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटाने करायचं. सामान्य माणसाकरता काम करायचं. अरे पाच वर्षात 1 रुपयांचा डाग देखील या महादेव जानकरांना कुणी लावू शकलं नाही. हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतरही फाटकाच राहीला, आजही फाटकाच आहे. जन्मभर फाटकाच राहणार आहे, म्हणूनच लोकांच्या मनात त्यांचं घर आहे. महादेवराव जानकर यांची श्रीमंती ही इथे बसलेले लोकं आहेत. महादेव जानकरांची श्रीमंती ही महाराष्ट्रातील दिन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्यांक यांच्या मनामध्ये जी जागा आहे, ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे”, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकरांचं कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.