निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाची जय्यत तयारी कुडाळ हायस्कूल पटांगण येथे सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर एकनाथ शिंदे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. शिवसेनेच्या या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार निलेश राणे हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आतापर्यंत असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला नसेल असा दावा या कार्यक्रमाच्या आयोजकांनी केला आहे. निलेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश आणि शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, भरत गोगावले, नारायण राणे, दादा भुसे आणि अन्य नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी कुडाळ हायस्कूल पटांगण येथे भव्य मंडप उभारण्यात आला आहे. संध्याकाळच्या या मेळाव्याच्या नियोजनाची माहिती निलेश राणेंनी घेतली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नियोजना संदर्भात त्यांनी काही सूचना देखील केल्याची माहिती मिळत आहे. साधारण पंधरा हजार लोक या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे.