मैदान छोटे, आकडे खोटे अन् संजय राऊत यांच्यासारखे भोंगेच फक्त मोठे, कुणाची खोचक टीका?
VIDEO | मुंबई बीकेसी येथे आज होणाऱ्या वज्रमूठ सभेपूर्वीच महाविकास आघाडीवर टीकांचा वर्षाव, भविष्यात नरे पार्कातच मविआच्या सभा होणार?, कुणी केलं भाकित?
मुंबई : 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आज महाविकास आघाडीची वज्रमूठ ही जाहीर सभा मुंबईमधील बीकेसीच्या मैदानावर होणार आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या सभेची जोरदार तयारी महाविकास आघाडीकडून करण्यात आलेली आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईमधील ही वज्रमूठ सभा होणार आहे. मात्र आजच्या सभेपूर्वीच महाविकास आघाडीवर राजकीय विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच भाजप नेते आशिष शेलार यांनी वज्रमूठ सभेवर ट्विट करून जोरदार निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये असे म्हटले की, जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनालाही कमी पडते, एकट्या भाजपाची सभा असते तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावे लागते अशा बीकेसीतील सर्वात छोट्यातील छोट्या मैदानात तीन पक्षांची सभा होते आहे. ही वज्रमुठ? असे म्हणत त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. तर मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे! शिवाजी पार्क सोडले, बिकेसीतील मोठी मैदाने घेणे आता टाळले. उबाठाचा प्रवास “ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे” तर भविष्यात नरे पार्कातच सभा होतील असे वाटतेय, असे म्हणत शेलारांनी मविआला खोचक टोला लगावला आहे.