सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रणितीताई भाजपात आल्या तर…
प्रणिती शिंदेला आणि मला भाजपची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. दरम्यान, त्यानंतर आज संध्याकाळी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट घडून आली. यावेळी भाजपच्या त्या ऑफरवर चंद्रकांतदादा काय म्हणाले?
सोलापूर, १७ जानेवारी २०२४ : प्रणिती शिंदेला आणि मला भाजपची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. दरम्यान, त्यानंतर आज संध्याकाळी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट घडून आली. नाट्यसंमेलमाचं निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सुशील कुमार शिंदे यांना भाजपने ऑफर दिली का? असा सवाल माध्यमांनी विचारला त्यावर चंद्रकांतदादा म्हणाले, “सुशीलकुमार शिंदे यांना अधिकृतपणे 2019 मध्ये आणि आताही भाजपात येण्याची ऑफर दिलेली नाही. शेवटी नात्यांच्या आधारे, हाय सुशीलजी, येणार की नाही? असं कुणीतरी म्हटलं असेल. आमचे नितीन गडकरी सारखे नेते त्यांचे मित्र आहेत. आताही त्यांनी त्यांच्या आठवणी काढल्या. अशा मित्रांपैकी कुणी म्हटलं असेल, पण याला राजकीय भेट किंवा राजकीय ऑफर म्हणता येणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.