उद्धव ठाकरे यांच्यात धमक असेल तर…, सावरकरांच्या भूमिकेवरून भाजपच्या बड्या नेत्याचं थेट आव्हान
VIDEO | हिंमत असेल तर सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसपासून वेगळं होऊन दाखवा, भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा
नागपूर : उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, सावरकरांच्या भूमिकेवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत थेट आव्हानच दिले आहे. सावरकरांबाबत एवढाच कळवळा आहे तर उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर करावं. उद्या घ्यावी पत्रकार परिषद आणि सांगावं, असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, ते मुख्यमंत्री असताना 50 वेळेला काँग्रेस पक्षांने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, मात्र उद्धव ठाकरे यांनी तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडले नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद भोगले. भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरे यांच्यात धमक असेल तर त्यांनी लगेच काँग्रेस पक्षापासून दूर होण्याचे जाहीर करावे, नुसत्या तोंडाच्या वाफा काढू नका, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला आहे.