फडणवीस म्हणाले, ‘सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं…’, हरियाणाच्या निकालानंतर राऊतांना डिवचलं
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर भाजपकडून मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हरियाणाच्या निकालावर आपली प्रतिक्रिया देत विरोधकांवर निशाणा साधला.
हरियाणाच्या निकालावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते की, आम्ही जिंकणार. मग काय बोलणार? सकाळी 9 वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करुन बसला होता, आता काय-काय बोलावं आणि काय-काय नको, असं त्याला वाटत होतं. आता मला त्यांना विचारायचं आहे, आता कसं वाटतंय?’, असं म्हणत हरियाणाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढे ते असेही म्हणाले, जनतेशी बेईमानी करुन निवडून आलेले हे लोकं, आता जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जे हरियाणात घडलं तेच महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबर महिन्यात घडलेलं बघायला मिळेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीत आपल्याला 10 पैकी 5 जागा मिळाल्या होत्या. आपण या निवडणुकीत सर्व रेकॉर्ड तोडले आणि थेट 50 जागा आपल्याला मिळत आहेत. जवळपास 60 वर्षांनंतर पहिल्यांदा एक पक्ष सतत तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबीज करत आहे. तो पक्ष म्हणजे आपला भारतीय जनता पक्ष असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.