‘अमोल मिटकरीला गोल टोपी घालून मोकळं करतो आम्ही…’, भाजप नेत्याचा हल्लाबोल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांचं महाराजांच्या नावाखाली राजकारण सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे याने मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या डाव्या भुवईवर खोप दाखवली आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. ज्यावेळी अफझल खानाने छत्रपती शिवरायांवर हल्ला केला तेव्हा ही खोप पडल्याचे शिल्पकार जयदीप आपटेचं म्हणणं आहे. तर अशापद्धतीचा पुतळा तयार करून जयदीप आपटेला नेमकं काय सांगायचं होतं? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे. तर महाराजांच्या इतिहासाशी किती प्रतारणा करणार? असा आक्रमक सवाल देखील अमोल मिटकरी यांनी केला आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. ‘अमोल मिटकरींचा धर्म तपासण्याची वेळ आली आहे, त्याची ** करून धर्मांतर तर झालं नाही ना, हे त्यांना पकडून तपासण्याची वेळ आली आहे’, असे वक्तव्य करून जिव्हारी लागणारा पलटावार नितेश राणेंनी केला आहे. तर अमोल मिटकरीला आम्ही आता गोल टोपी घालून मोकळा करतो, कारण तो हिंदू धर्मात राहिला नाही, असेही म्हणत नितेश राणेंनी जोरदार घणाघात केला आहे.