Special Report | भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय, ऊसतोड मजुरांसोबत मुंडेंच्या गप्पा आणि जेवण
दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून आज पंकजा मुंडे यांनी देखील सर्वसामान्यांसोबत नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पंकजा मुंडेंनी ऊसाची मोळी उचलली, वीट भट्टीवर कामही केले आणि केळीच्या पानावर जेवणाचा आस्वादही घेतला आहे.
बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे आणि याच जयंतीनिमित्त त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी नवीन संकल्प हाती घेतलाय. कष्टकरी मजुरांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज त्या थेट ऊसाच्या फडात पोहचल्या. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून आज पंकजा मुंडे यांनी देखील सर्वसामान्यांसोबत नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पंकजा मुंडेंनी ऊसाची मोळी उचलली, वीट भट्टीवर कामही केले आणि केळीच्या पानावर जेवणाचा आस्वादही घेतला आहे. यावेळी खासदार प्रीतम मुंडे याही बरोबर होत्या. ऊसतोड मजुरांचा नेता म्हणून दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची खरी ओळख होती. मुंडे यांच्या निधनानंतर ऊसतोड मजुरांचं नेतृत्व त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याकडे आलं. सलग दोन वेळा विजय मिळवल्यानंतर पंकजा मुंडे यांना यावेळी मात्र पराभव स्वीकारावा लागला. पंकजा मुंडे यांची क्रेझ कमी झाली की काय अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात झाली. मात्र दोन वर्षात पंकजा मुंडे त्यांची मतदारसंघावरील पकड मजबूत करताना दिसून आल्या.