महायुतीतच ठिणगी, ऑल इज नॉट वेल? शिंदे सेना-भाजपचेच नेते भिडले, बघा कोणाची जीभ घसरली
महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात खटके उडण्यास सुरूवात झाली आहे. रामदास कदम यांनी भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण कुचकामी असल्याचे म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर यावर प्रत्युत्तर देत रविंद्र चव्हाण यांनी थेट तोंड फोडण्याचा इशारा दिला.
महायुतीत उघडपणे खटके उडाल्याचे चित्र सध्या दिसतेय. रामदास कदमांनी रविंद्र चव्हाणावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांच्यावर नाराजी व्यक्त केली आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी यावर बोलणार असल्याचे सांगितले. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना कुचकामी मंत्री म्हटलं इतकंच नाहीतर त्यांनी त्यांच्या राजीनाम्याचीही थेट मागणी केली. प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला, मात्र मुंबई- गोवा या रस्त्याचा वनवास काही संपत नाही. या मार्गाची अवस्था खूप वाईट आहे. नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे, असा सवाल करत रामदास कदमांनी टीका केली. तर युतीधर्म पाळतोय त्याचा अर्थ असा नाही की कोणीही काहीही बोलेल आणि आम्ही ऐकून घेऊ. असं होणार नाही. एक लक्षात ठेवा, तोंड सांभाळून बोलायचं नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही’, असे प्रत्युत्तर देत रविंद्र चव्हाण यांनी रामदास कदमांना दिलं.