इम्तियाज जलील यांच्या रॅलीवर नितेश राणेंचा खोचक टोला, ‘…इतकं तर आम्ही रोज नाश्त्याला खातो’
संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेने निघालेली जलील यांची रॅली ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्याजवळ पोहोचली तेव्हा इम्तियाज जलील यांच्या समर्थकांची गर्दी वाढू लागली. इम्तियाज जलील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू झाली. त्याचवेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी समर्थकांवर सौम्य लाठीचार्ज केला.
माजी खासदार, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आणि त्यांच्या समर्थकांकडून छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत तिरंगा संविधान रॅली काढण्यात आल्याचे पाहायला मिळाले. रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. या विरोधात जलील यांच्याकडून ही तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली आहे. इम्तियाज जलील यांनी मुंबई चलोच्या नाऱ्याने ही रॅली काढली होती. त्यात हजारो मुस्लिम लोक सहभागी झाले होते. महंत रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. इम्तियाज जलील यांनी काढलेल्या तिरंगा संविधान रॅलीवरून नितेश राणे यांनी खोचक टोला लगावला आहे. नितेश राणे यांनी एक फोटो शेअर करताना गर्दीची तुलना डिशभर पोह्यांशी केली आहे आणि नितेश राणे म्हणाले की, फक्त इतकेच.. इतके पोहे तर आम्ही रोज सकाळी नाशत्यात खातो !