‘माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला’, संशय व्यक्त करत भाजप आमदाराचा हल्लाबोल
रोहित पवार यांच्या कटात अजित पवार यांचा सहभाग असल्याचा संशयही राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी रोहित पवारांसाठी सभा घेतली असती तर काय? असा सवालही राम शिंदे यांनी व्यक्त करत राजकीय सारीपाटात माझा बळी गेला असल्याची खंतही बोलून दाखवली.
‘कर्जत-जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. माझा पराभव हा नियोजित कट होता.’, असं मोठं वक्तव्य भाजप नेते आमदार राम शिंदे यांनी केलं आहे. इतकंच नाहीतर रोहित पवार यांच्या कटात अजित पवार यांचा सहभाग असल्याचा संशयही राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी रोहित पवारांसाठी सभा घेतली असती तर काय? असा सवालही राम शिंदे यांनी व्यक्त करत राजकीय सारीपाटात माझा बळी गेला असल्याची खंतही बोलून दाखवली. ‘अजित पवार यांचं माध्यमांसमोर एक वक्तव्य आलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता. कर्जत-जामखेडमध्ये माझ्याविरोधात एक कट रचला गेला होता. त्याचा आम्ही बळी ठरलो, याचा आज प्रत्यय आला आहे.’, असे राम शिंदे म्हणाले. तर वारंवार महायुतीचा धर्म पाळण्यासंदर्भात वरिष्ठांकडे, पक्षांकडे आणि अजित पवार यांच्याकडे मागणी करत होतो. मात्र आज अजित पवार यांनी स्वतः सांगितलं, मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं. याचा अर्थ हा नियोजित कट होता. त्याचा मी बळी ठरलो. मला वाटतं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्येच असा प्रश्न निर्माण होत असेल तर हे महायुतीसाठी योग्य नाही, पण यावर वरिष्ठांनी दखल घेऊन विचारविनिमय केला पाहिजे, अशी मागणी राम शिंदे यांनी व्यक्त केली.