सदाभाऊ खोत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादात आलेत. शरद पवारांना महाराष्ट्र बदलून त्यांना त्यांच्या चेहऱ्यासारखा करायचा का? असं वक्तव्य करून सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या आजारपणावरून वादग्रस्त वक्तव्य केलंय. पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमाफी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. असं सदाभाऊ खोत भाषणाच्या पहिल्या टप्प्यात म्हणाले. नंतर आमचं सरकार राज्यात पुन्हा आल्यावर कर्जमाफी देवू, असं सदाभाऊ खोत म्हणाले. “अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, असं सदाभाऊ खोत म्हणाले. तर सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरुन वक्तव्य करताना “आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?”, असा खोचक सवाल केलाय. “महाराष्ट्र बदलायचा आहे म्हणजे तुला कसला चेहरा पाहिजे?” असं वादग्रस्त वक्तव्य जतमधील महायुतीच्या सभेत सदाभाऊ खोत यांनी केलंय.