‘संजय राऊत भकास, विध्वंस अन् लग्नतोड्या माणूस’, भाजप खासदाराची जिव्हारी लागणारी टीका
मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. यावरूनच भाजप खासदार अनिल बोंडे यांना सवाल केला असता त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत कोणत्याही प्रकारची युती आघाडी ठेवू शकत नाही. कारण विघ्न घालणारा आणि विघ्न संतोषी माणूस संजय राऊत आहे, असे म्हणत भाजप खासदार अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. अनिल बोंडे यांनी यावेळी एक किस्सा सांगत संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली. ‘आमच्या खेडे गावात एक माणूस होता. गावात एखाद्या पोरीला पाहुणे पाहिला आले की त्याच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली जायची. गावातही सांगितलं जायचं की एखाद्या मुलीला पाहुणे बघायला आले की त्याला सांगू नका. कारण त्याचा शिरस्ता असा होता की तो ठरत असलेलं लग्न तोडायचा.. असा लग्नतोड्या माणूस कोणी असेल तर तो संजय राऊत आहे.’, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी करत संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. इतकंच नाहीतर संजय राऊत जिथं असेल तिथे भकास आणि विध्वंस होणं निश्चित आहे, असे म्हणत अनिल बोंडे यांनी राऊतांवर हल्ला चढवला आहे.