पंतप्रधान मोदींविषयी बोलताना जरा…, भाजपच्या उन्मेश पाटील यांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा
तुमच्या नावाच्या मागे आंबेडकर आहे म्हणून आदर करतोय, आंबेडकरांवर टीका करताना काय म्हणाले उन्मेश पाटील?
गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली. यावरून राजकीय वर्तुळात एकच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर आपल्याला आदराने बाळासाहेब म्हणतात. तुम्ही तुमची बरोबरी बाळासाहेब ठाकरेंसोबत करु नका किंवा त्यांचा हेवा देखील करू नका. तुम्ही विचार करा ६-६ महिने मंत्रालयात न जाण्याचा विक्रम करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याशी युती केली आणि ही युती करतांना कोणताही विचार केला नाही, अशी म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.
ज्या व्यक्तीने आपले कुटुंब, आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले आहे. देशासाठी अहोरात्र राबणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांविषयी बोलताना जनाचा नाही तर मनाचा विचार करायला हवा. प्रकाश उर्फ बाळासाहेब तुमच्या नावाच्या मागे आंबेडकर आहे, म्हणून आम्ही आदर करतोय. यावेळी माफ करतो पण इथून पुढे अशी चूक केल्यास भाजप, युवा मोर्चा, कार्यकर्ते आणि देशाचे नागरिक सहन करणार नाही, अशी घणाघाती टीका देखील उन्मेश पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली.