शिंदे-फडणवीस सरकारला मुंबई हायकोर्टाकडून निधी वाटपावरुन मोठा झटका
VIDEO | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना शिंदे-फडणवीस सरकारला मुंबई हायकोर्टाकडून मोठा झटका
मुंबई : मुंबई हायकोर्टाने निधी वाटपाबाबत राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आमदारांच्या निधी वाटपात खरंच पक्षपात होतो का ते समोर येण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती दिली आहे. ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांनी या विषयी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. त्यांच्या आरोपांची दखल घेत मुंबई हायकोर्टाने गेल्या आर्थिक वर्षात कोणाला किती निधी दिला? याचे तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात सत्तांतर होऊन नऊ महिने होत आले आहेत. राज्यात आता नवं आर्थिक वर्ष सुरु झालं असून गेल्या आर्थिक वर्षात महाविकास आघाडीच्या आमदारांना हवा तसा निधी गेला नाही. आमदार निधी वाटपात पक्षपातीपणा केला गेला, अशी तक्रार महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली आहे. त्यातूनच रवींद्र वायकर यांनी याबाबत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.