दारू पिऊन आणि निष्काळजीपणे गाडी चालवताय? मग ही बातमी वाचाच, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
VIDEO | आता मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांना बसणार मोठा फटका, काय दिले मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश?
मुंबई : तुमच्याकडे बाईक किंवा कोणतीही मोठी गाडी असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही रस्त्यावर गाडी चालवताना मद्यपान करून किंवा निष्काळजीपणे गाडी चालवता का? असे करत असाल तर आता तुम्हाला ते महागात पडू शकतं. कारण अशा वाहन चालकांना आता चपराक बसणार आहे. मद्यपी वाहन चालकांविरोधात आता अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. यासंदर्भातील तसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. तर वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यामध्ये प्रवाशांचा होणारा मृत्यू त्यामुळे वाहनाचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी कार्यवाही होणे अपेक्षित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. निष्काळजीपणे वाहने चालवण्यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करावी, विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी वाहनचालकांवरही कडक कारवाई करावी अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.