पण मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, शेंडगेंच्या गाडीवरील शाईफेक प्रकरणानंतर भुजबळांची प्रतिक्रिया
'शेंडगे हे ओबीसी चळवळीचे नेते आहे. लोकांना कोणाला मत द्यायचं? हे सांगण्यासाठी कोणाला अशी भीती दाखवणे, हल्ला करणे असे प्रकार होता कामा नये. काही अति उत्साही कार्यकर्ते असतात ते असं काहीतरी करतात. माझ्याबद्दल ते म्हणाले भुजबळ यांनी घाबरून माघार घेतली, पण मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही'
सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणुकीतील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर हल्ला झाला असेल तर ते अतिशय अयोग्य आहे. शेंडगे हे ओबीसी चळवळीचे नेते आहे. लोकांना कोणाला मत द्यायचं? हे सांगण्यासाठी कोणाला अशी भीती दाखवणे, हल्ला करणे असे प्रकार होता कामा नये. काही अति उत्साही कार्यकर्ते असतात ते असं काहीतरी करतात. माझ्याबद्दल ते म्हणाले भुजबळ यांनी घाबरून माघार घेतली, पण मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही. माझ्यामुळे काही पक्षांमध्ये आणि कोणाच्या इच्छुक लोकांची अडचण होत असेल तर मी दूर होतो, तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या. ज्याचा तुम्ही निर्णय घ्याल आम्ही त्यामागे खंबीरपणे उभे राहणार त्याच्यासाठी मी माघार घेतली असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, एवढी मोठी ओबीसी लढाई झाली त्याला मी नाही घाबरलो आणि हल्ले झाले तेव्हा नाही घाबरलो. त्यामुळे दादागिरी करून कोणाला थांबवू शकत नाही. प्रकाश शेंडगे यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणीही भुजबळांनी केली.