तिथेच खरी समस्या, पुरूष कर्मचाऱ्याला मुलींच्या स्वच्छतागृहात प्रवेश कसा? बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षांचा सवाल
बदलापूरच्या प्रकरणावर तब्बल ११ तासांनंतर एफआयआर दाखल झाला, तिथेच खरी समस्या असल्याचे राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी म्हटले आहे. तर पुरूष कर्मचाऱ्याला मुलींच्या स्वच्छतागृहात प्रवेश कसा? असा सवाल देखील सुशीबेन शाह यांनी उपस्थित केला आहे.
राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी बदलापूर येथे झालेल्या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. शाळेत किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कंत्राटी पद्धतीवर जर कोणाला कामावर घ्यायचे असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची पार्श्वभूमी न तपासता कसे कामावर घेतात? असा सवालही त्यांनी केला. अशा लोकांना शाळेत ठेवण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे असेही त्यांनी सांगितले, जो पर्यंत विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचा गणवेश आहे, तोपर्यंत मुलांची जबाबदारी ही शाळेची असते, असे सुशीबेन शाह यांनी म्हटले. तर घटनेत संबंधितांना निलंबित करून काहीही होणार नाही आपण प्रकरणातील तळागाळातील घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, आरोपीवर POCSO मध्ये FIR ताबडतोब नोंदवला पाहिजे. विशेष विभागाकडे फाईल यापूर्वीच पाठवण्यात आली असल्याचे देखील समजले आहे. आज आपण स्वत: मुलीच्या कुटुंबीयांशी बोलणार आहोत, त्यांची मानसिक स्थिती अत्यंत बिकट आहे. आम्ही कायद्यानुसार यंत्रणा राबवू, असे त्यांनी सांगितले.