अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी; थोड्याचवेळात अंत्यसंस्कार
गोळीबारात मृत्यू पावलेले अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव त्यांच्या बोरिवलीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले तर अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलगी देखील धाय मोकलून रडताना दिसले
मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४ : दहिसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल गोळीबार करण्यात आला. मॉरिस नोरोन्हा नावाच्या गुंडाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरूवारी रात्री ८ वाजता गोळ्या झाडल्या. इतकंच नाहीत त्यांने स्वतःवर ही गोळीबार करून आत्महत्या केली. दरम्यान, गोळीबारात मृत्यू पावलेले अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव त्यांच्या बोरिवलीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले तर अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलगी देखील धाय मोकलून रडताना दिसले. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी देखील त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. थोड्याच वेळात त्यांच्यावर बोरिवलीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.