दिवाळी संपताच मोठे फटाके फुटणार असा दावा करत काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंपाचे संकेत दिलेत. तर दिवाळीमध्ये फटाके फुटतील मात्र आपल्या विजयाच्या एटमबॉम्ब फुटेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. इतकंच नाहीतर २३ तारखेला देव दिवाळी साजरी करणार असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यासोबच संजय राऊत यांचं वक्तव्यही चर्चेत आहे. दिवाळी आहे, कुणी फटाके फोडत असेल तर फोडू द्या, असं वक्तव्य संजय राऊत यांनी अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून केलंय. दरम्यान संजय राऊत दुसऱ्यांच्या फटाक्यांकडे बघत आहेत. मात्र आता आवाज ऐवढा दणदणीत होईल की आवाजामुळे राऊतांच्या कानठळ्या बसतील, असं म्हणत संजय शिरसाटांनी राऊतांवर निशाणा साधलाय. यंदाची दिवाळी आगळी-वेगळी असून यंदा राजकीय फटाके फुटतील मात्र विधानसभा निवडणुकीत मविआच्या विजयाचे फटाके फोडणार, असा विश्वास बाळासाहेब थोरांतांनी व्यक्त केला आहे.