Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’बंद होणार? योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत? सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपली
'लाडक्या बहिणीचं काय झालं. काही नाही. बंद झाली ती योजना. मी निवडणुकीत सांगत होतो. मी खरं सांगून पटलं नाही. त्यांचं खोटं सांगून पटलं. कमाल आहे. विधानसभेत चर्चा कशावर औरंगजेबावर. तुर्कस्थान हा देश तलवारीच्या धारेवर धर्माच्या धारेवर उभा राहिला. औरंगजेब, बाबर वगैरे हे तुर्की मंगोलियन आहेत. त्यांना मोघल म्हणतात'
‘सरकारकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नाहीत. सरकार पैसे वाटू शकत नाहीत. लाडकी बहीण बंद होणार’, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. काल शिवाजी पार्क येथे झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘ लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये करणार. म्हणजे महाराष्ट्रावर वर्षाला ६३ हजार कोटीचे कर्ज होईल. हे वाटू शकत नाही. सरकारकडे पैसे नाहीत. ही योजना बंद होणार आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितलं कोणी? राज्यातील प्रश्न सोडवा’, असं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे होताना दिसताय. ‘आता गरज सरो आणि वैद्य मरो असं झालंय. भाजप आणि शिवसेनेचे मनसुबे साकार झालेत. त्यामुळे भविष्यात योजना बंद करण्याच्या अवस्थेत असल्याचे अजित पवार यांचे सूतोवाच आहे.’, असं ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनी म्हटलंय. तर २१०० रूपये देण्यासाठी थोडा कालावधी लागेल, असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलंय.