Devendra Fadnavis : अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं विरोधकांना थेट उत्तर
'पहिल्यांदा लक्षात ठेवा. या देशात २०१२ पर्यंत ईव्हीएम होतं. त्यानंतर ईव्हीएम नाही. २०१२ नंतर व्हिव्हीपॅट आहे. व्हिव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे. आपण मतदान केल्यावर आपल्याला चिन्ह दिसतं. ते चिन्ह बॅलेट बॉक्समध्ये जातं. ईव्हीएमच्या मोजणीत व्हीव्हीपॅटचं मतदानही मोजलं जातं. ते जुळलं तरच निकाल जाहीर केला जातो. आपण एकप्रकारे बॅलटवरच मतदान करतो.'
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र या यशानंतर विरोधकांनी महायुतीच्या विजयावर शंका घेत ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. इतकंच नाहीतर संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक मतदानाची आकडेवारी कशी वाढली? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले, ‘सहा वाजेनंतरचं मतदान १७ लाख आहे. ५ ते ६ वाजेचं मतदान गृहित धरलं नाही आणि ७५ लाख मतदान आलं कुठून रोज विचारलं तर कसं चालेल. कुठून आलं नाही. जनतेनेच आम्हाला निवडून दिलं आणि आम्ही जिंकून आलो.’ पुढे ते असेही म्हणाले, ‘मारकडवाडीत काय काय चाललं. मला कुणाचं आश्चर्य वाटलं नाही. मला फक्त शरद पवार यांचं आश्चर्य वाटलं. पवार हे बॅलन्स नेते आहेत. काँग्रेसने अनेक वेळा ईव्हीएमवर बोलले. पवार कधीच बोलले नाही. यावेळी पवार बोलले. म्हणाले, छोटी राज्य काँग्रेसला आणि मोठी राज्य भाजपला. मला सांगा बंगाल छोटं राज्य आहे. ममता दीदी आणि ओमर अब्दुल्ला यांनी ईव्हीएमवर बोलणं सोडून द्या असा सल्ला दिला.’, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.