शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मुंबईतील ‘या’ टोलनाक्यांवर टोलमाफी; कधीपासून अंमलबजावणी?
मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारने दिला आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात ही मोठी घोषणा केली आहे. मुंबईत एमएसआरडीसीने ५५ उड्डाणपुलांची उभारणी केली. या पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर सर्वप्रथम टोलनाके उभारण्यात आले होते. पुल उभारणीचे काम अंतिम टप्यात येताच टोलनाके उभारण्यासाठी १९९९ मध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर २००२ मध्ये हे पाचही टोलनाके सुरु करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईमध्ये प्रवेशद्वारावर टोल वसुली सुरू झाली होती. गेल्या २२ वर्षांपासून मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोल आकारण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईतील सर्व टोल माफ करण्यात यावे, यासाठी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाकडून वारंवार आंदोलन करण्यात येत होते. याकरता अनेकदा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची देखील भेट घेतली होती.