राजकीय व्यासपीठासह ठाण्यात क्रिकेट पिचवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या क्रिकेट स्पर्धेला हजेरी लावली.
आतापर्यंत आपण राजकीय नेते मंडळी, पुढाऱ्यांना केवळ राजकीय व्यासपीठावर जोरदार भाषण ठोकताना पाहत आलो आहोत. पण असेही काही नेते, पुढारी असतात त्यांच्याकडे इतरही अनेक कला, गुण असतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्याला अपवाद नाही. राजकीय व्यासपीठावर भाषणाची फटकेबाजी करून उपस्थितांची मनं जिंकणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यातील क्रिकेटचं मैदानही गाजवलं.
एकनाथ शिंदे यांनी चक्क क्रिकेटच्या मैदानावर उतरत जोरदार फटकेबाजी केली. चौकार, षटकार मारत हम भी कुछ कम नही हे दाखवून दिलं. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनाच तुफान फटकेबाजी करताना पाहून खेळाडूंचाही उत्साह चांगलाच वाढला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या क्रिकेट स्पर्धेला हजेरी लावून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली.