Eknath Shinde यांनी मराठा समाजाला दिली ग्वाही; म्हणाले, ‘हे शासन खंबीर अन्…’
VIDEO | जालन्यात घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'काही स्वार्थी राजकीय नेते मराठा तरुणांच्या आडून आपला स्वार्थ साधत आहेत'
जालना, २ सप्टेंबर २०२३ | “माझी मराठा समाजाला आंदोलकांना नम्र विनंती की, त्यांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. मराठा समाजाला मी आवाहन करतो की, त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. हे शासन त्यांच्या न्याय हक्कांसाठी खंबीरपणे उभे आहे”, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर “मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. मला समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही”, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिलं आहे. “आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांनी संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये. आंदोलनाच्या आगीवर स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजू पाहणाऱ्यांपासून सावध राहावे”, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.