शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची नाहीत तर ते बाळासाहेब ठाकरें यांची आहेत. तसंच घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांचे अपत्य आहेत, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कालच्या सभेत म्हटलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात होत असलेल्या भरसभेतून प्रत्युत्तर दिलं. एकनाथ शिंदे म्हणाले, जनतेने शिवसेना आणि भाजपची युतीचं सरकार येईल त्याप्रमाणे जनतेने मतदान केलं आणि निवडून दिलं, मात्र खुर्चीसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तोडून-मोडून टाकण्याचं काम केलं, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकं म्हणालेत शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे आणि बाळासाहेबांचंच धनुष्यबाण आहे. खरंय शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिवसेनेचंच आहे. पण ज्याने ते गहाण टाकलं होतं ते आम्ही सोडवलं आणि आज अभिमानाने आम्ही धनुष्यबाण आमचं असल्याचं म्हणतोय, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंनी सभेतून केलेल्या टीकेवर नाव न घेता प्रत्युत्तर दिलं.