‘दोन वर्षांपूर्वीच जनतेनं ज्यांना…’, उद्धव ठाकरेंच्या ‘गेट आऊट’ला मुख्यमंत्री शिंदेंचं थेट प्रत्युत्तर
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. इतकंच नाहीतर मुंबईतील हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया असा महाविकास आघाडीकडून मोर्चाही काढण्यात आला.
महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनातून उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. यालाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. दोन वर्षांपूर्वीच जनतेनं त्यांना गेट आऊट केले आहे. जनतेने त्यांना सत्तेतून पायउतार करून घरात बसवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन राजकारण करून औरंगजेब आणि अफझल खानाच्या वृत्तीचं काम करणं असं सध्या त्यांच्यात सुरू आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी आणि नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन शिवसेना आणि भाजप यांच्या सरकारमध्ये, सत्तेत सामील झालेत पण सरकार स्थापन केलं दुसऱ्यांसोबत… असं वागणाऱ्यांचे शिवाजी महाराज यांच्यावर कसं प्रेम असू शकतं? असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत अप्रत्यक्षपणे ठाकरेंना केला. आम्ही इतकंच सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन कुणीही राजकारण करू नये, असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना केले आहे.