Ranveer Allahbadia Video : निर्लज्ज कॉमेडियन रणवीर अल्लाहाबादिया, राज्यभरात संताप; India’s Got Latent मध्ये काय घडलं?
प्रत्येक माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशा विधानाची एक बातमी समोर आली आहे. इंडियाज गॉट लेलेंट या शोमध्ये रणवीर अल्लाहाबादिया या नावाच्या व्यक्तीने आई-वडिलांच्या नातेबद्दल अक्षम्य विधान केले आहे.
कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता आणि नात्यांच्या साऱ्या मर्यादा तोडणारा इंडियाज गॉट लेलेंट हा शो वादात आला आहे. युट्युबर रणवीर अल्लाहाबादिया याने त्या शोमध्ये आई-वडिलांबद्दल अतिशय अक्षम्य विधान केल्यानंतर संताप उसळला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या समर्थकांनी या विरोधात मुंबईतल्या खारमध्ये आंदोलन करत कारवाईची मागणी केली. दरम्यान या प्रकरणी इंडियाज गॉट लेलेंट शोच्या काही सदस्यांची चौकशी सुरू झाली आहे. दुसरीकडे तीव्र संताप आणि कारवाईची कुऱ्हाड पडणार या भीतीने युट्युबर रणवीर अल्लाहाबादियाने आपण केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करताना रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “इंडियाज गॉट लेटेंटमध्ये मी जे बोललो होतो, ते मला बोलायला नको होतं. मला माफ करा.” यासोबतच, शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये तो असंही म्हणाला, “माझी वक्तव्य योग्य नव्हतं, आणि ते मजेशीरही नव्हतं, मी विनोदात तज्ज्ञ नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी इथे आलो आहे. तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं होतं की मला माझा प्लॅटफॉर्म अशा प्रकारे वापरायचा आहे का? तर नाही, मी जे बोललो त्यासाठी मी फक्त तुमची सर्वांची माफी मागतो.” मात्र या आधी सुद्धा हा शो विविध कारणांनी वादात आलेला असताना आताच्या या विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुद्धा रंगत आहेत.