Saamana : मोदींना आता विदेश पर्यटन करता येणार नाही कारण.., ‘सामना’तून पंतप्रधानांवर निशाणा
'राहुल गांधी यांनी मोदी यांना अनेक विषयांवर खुल्या मंचावरील चर्चेचे आव्हान दिले व मोदी यांनी पळ काढला. लोकसभेच्या मंचावर आता ही चर्चा घडेल व जग टाळया वाजवील. राहुल गांधी यांना शिष्टाचाराचे 'राम राम' करूनच पंतप्रधान मोदी यांना आसनस्थ व्हावे लागेल. संसदेत 'मोदी मोदी'चे फालतू नारेही बंद होतील'
लोकसभेत टोकदार प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता मिळाला आहे, संसद सुरू असताना पंतप्रधान मोदी यांना आता विदेश पर्यटन करता येणार नाही, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. तर आता देशाची हवा बदलली आहे. लोकशाहीचा नवा चौकीदार लोकसभेत रुजू झाला आहे, असे म्हणत राहुल गांधी यांचं सामनातून अभिनंदनही करण्यात आलं आहे. पुढे असेही म्हटले की, ‘राहुल गांधी यांनी मोदी यांना अनेक विषयांवर खुल्या मंचावरील चर्चेचे आव्हान दिले व मोदी यांनी पळ काढला. लोकसभेच्या मंचावर आता ही चर्चा घडेल व जग टाळया वाजवील. राहुल गांधी यांना शिष्टाचाराचे ‘राम राम’ करूनच पंतप्रधान मोदी यांना आसनस्थ व्हावे लागेल. संसदेत ‘मोदी मोदी’चे फालतू नारेही बंद होतील.’ तर राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सामनातून राहुल गांधी यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच नरेंद्र मोदी, अमित शाह यांना इशाराही देण्यात आला आहे.