परतीचा दोर तुटलाय पण शिंदे अन् दादांच्या 40 आमदारांची पुढच्या महिन्यात घरवापसी? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
'अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांची पुढच्या महिन्याभरात घरवापसी होणार आहे, अशी परिस्थिती राज्यात आहे. ते आमदार संपर्क साधत असल्याची माहिती आहे. वस्तुस्थिती नेमकी काय आहे माहिती नाही मात्र यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे.'
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक राजकीय नेते मोठ मोठाले दावे आणि प्रतिदावे करताना दिसू लागले आहेत. अशातच विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा केला आहे. यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. लोकसभेच्या निकालानंतर शिंदे गटाचे आमदार परत एकदा ठाकरे गटात येण्याच्या चर्चा सध्या आहेत. यावर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, त्यांना आता बोलायला जागा राहिली नाही. गद्दारीचा शिक्का बसलेली मंडळी आहे. त्यांचा पक्ष संपला आहे. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांची पुढच्या महिन्याभरात घरवापसी होणार आहे, अशी परिस्थिती राज्यात आहे. ते आमदार संपर्क साधत असल्याची माहिती आहे. वस्तुस्थिती नेमकी काय आहे माहिती नाही मात्र यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. वारे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे हे त्यांनाही कळून चुकलं आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.