“मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं… ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता नवीन ‘उदय'”, काँग्रेस नेत्याच्या विधानानं खळबळ
“तुम्हाला उद्या शिवसेनेत तिसरा नवीन उदय दिसेल. ही शक्यता नाकारता येत नाही” असं काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
एकनाथ शिंदे यांची आता गरज संपली असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. उद्धव ठाकरेंना संपवलं आता एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवीन ‘उदय’ पुढे येईल, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर काही उदय दोन्ही डग्ग्यावर हात मारून आहेत, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणत्या ‘उदय’कडे आहे. यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “आमच्या शिंदे साहेबांची स्थिती सध्याच्या राजकारणात इतकी बिकट आहे. मी शब्द वापरला, तर चुकीचा अर्थ निघेल. पण आता शिंदे साहेबांची गरज संपली का? आणि ते बाजूला व्हावेत, मला भिती वाटते की, उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं. आता शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल?. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल” असं ते म्हणाले. “तुम्हाला उद्या शिवसेनेत तिसरा नवीन उदय दिसेल. ही शक्यता नाकारता येत नाही” असं मोठं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.