Rajni Patil | रजनी पाटील यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या 12 नावांच्या यादीत काँग्रेसकडून रजनी पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे. मात्र, आता रजनी पाटील यांना काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसनं आपला उमेदवार घोषित केलाय. काँग्रेसकडून रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर काँग्रेसकडून रजनी पाटील, राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव, मुकूल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, अखेर रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार का? असा प्रश्न काँग्रेसमधूनच विचारण्यात येत आहे. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या 12 नावांच्या यादीत काँग्रेसकडून रजनी पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे. मात्र, आता रजनी पाटील यांना काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना रजनी पाटील यांच्या जागेवर विधान परिषदेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.