Santosh Deshmukh Case : चक्क न्यायाधीशासोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची रंगाची उधळण? दमानियांकडून थेट फोटो अन् व्हिडीओ ट्विट
केजला होळीचा कार्यक्रम असताना तिथे राजेश पाटील जे एक निलंबित अधिकारी आहेत आणि दुसरे प्रशांत महाजन हे दोन्ही अधिकारी आले आहेत. ते सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांसोबत होळी खेळताना दिसतात. हे बघितल्यावर मला अतिशय धक्का बसला. न्यायाधिशांनी एखाद्या अधिकाऱ्यांबरोबर होळी खेळावी, ही अपेक्षा नाही, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील आणि याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत. संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या सोबत रंगाची उधळण करताना दिसत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी पोलीस अधिकारी सक्तीच्या रजेवर आहेत. तर दुसरीकडे न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. आता या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. केवळ दावाच नाहीतर त्यांनी काही फोटो आणि व्हिडीओ देखील ट्विट केले आहे. देशमुख हत्या प्रकरणावरील सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांसोबत सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी रंगांची उधळण केल्याचे दमानियांनी म्हटले आहे. मात्र या फोटो आणि व्हिडिओची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही.