Parali Vaijnath Jyotirlinga : वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; जाणून घ्या, श्रावणी सोमवारचं महत्त्व
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो. या सोमवारला श्रावणी सोमवार म्हटलं जातं. या दिवशी काही जण उपवास करतात तर काही जण महादेवाची मनोभावे पूजा, अभिषेक करून दर्शन घेतात. अशातच आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्याने बीडच्या वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
आज श्रावणातील दुसरा सोमवार असून यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील परळीचे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी रात्री बारा वाजल्यापासून खुलं करण्यात आलं आहे. श्रावणानिमित्त मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर पाच क्विंटल विविध फुलांच्या माध्यमातून सुंदर अशी आरासही करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात 135 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. आज श्रावणातील दुसरा सोमवार असून दर्शनासाठी भाविकांची योग्य व्यवस्था करण्यात आली असून महिला आणि पुरुषांसाठी स्वत्रंत रांगा करण्यात आल्या आहेत. तर विशेष पासची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. यासोबत स्वयंसेवक आणि पोलिसांची विशेष यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित आहे. दुसऱ्या सोमवारी जवळपास एक ते दीड लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज मंदीर समितीकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारचे नेमके महत्त्व काय असते ते जाणून घ्या…