तिकीट कन्फर्म… अजित पवारांसोबत जागावाटपासंदर्भात बैठक, दादांकडून विद्यमान आमदारांना थेट हमी
आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होणार असल्याची सध्या राज्यात परिस्थिती आहे. मंत्री गिरीश महाजन आणि शिंदेंचे आमदार भरत गोगावले यांनी येत्या 15 दिवसांत आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीची घोषणा होईल, असा दावा केला. तर अजित पवार यांच्याही आपल्या आमदारांसोबत जागावाटपांवरून बैठका सुरू आहेत.
आगामी निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात अजित पवार गट राष्ट्रवादीची एक बैठक झाली. या बैठकीत जागावाटपावर सखोल चर्चा करण्यात आली, दरम्यान, विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही, अशी हमी अजित पवार यांनी अजितदादा गटाच्या बैठकीत दिली आहे. २०१९ मध्ये निवडून आलेल्या ५४ आमदारांसोबत १५ ते २० अधिक जागांची मागणी कऱण्यात येणार असून अजित दादा गट अर्थात राष्ट्रवादी ७० पेक्षा अधिक जागांवर दावा केला जाणार आहे. अजित पवार गट यांच्या राष्ट्रवादीकडून यापूर्वी ८० जागांवर दावा करण्याची तयारी दर्शवली होती. तर जागावाटपावर झालेल्या बैठकीत फक्त १५ जागा वाढवून मागण्याची रणनिती आखण्यात आली आहे. दरम्यान, भाजप, शिंदे गट अशा मित्रपक्षातील नेत्यांकडून कोणतीही वादग्रस्त वक्तव्य केली तरी तुम्ही कोणीही वादग्रस्त करू नका, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.