महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं….
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातून नेमका पुढील मुख्यमंत्री कोण होणार? महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? असे सवाल सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? अशा चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात ते बोलत होते. महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा वाद आहे का? यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “आमच्याकडे चेहऱ्याचा वाद नाही. जे मुख्यमंत्री असतात तेव्हा चेहऱ्याचा वाद नसतो. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक होते. निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे सांगण्याचा अधिकार मला नाही. आमचं पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. आज सरकार म्हणून आम्ही निवडणुकीचा प्रचार एकत्र करत आहोत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, असा शब्द तुम्ही दिलाय का? असा सवाल केला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ शब्द देणं या गोष्टी आमच्या लेव्हलला नसतात. ती पार्लमेंट्री बोर्डात चर्चा होते. एकनाथ शिंदेंशी बोर्डाची चर्चा झाली असेल. आमचं पार्लमेंट्री बोर्ड, एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे एकत्र बसून निर्णय घेतील” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.