‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मुख्यमंत्र्यांकडून महागाई भत्त्यात वाढ, आता किती मिळणार DA?
VIDEO | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली वाढ, महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून वाढवून आता ३८ टक्के
मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवापूर्वीच राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के होणार आहे. या निर्णयाचा फायदा एसटी महामंडळातील ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिकृत ट्वीट केले आहे. दरम्यान, एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर कोणताही निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. दरम्यान, या घोषणेने काहिसा कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.