‘लाडकी बहीण’विरोधात कोर्टात कुणाचा माणूस गेला? सत्ताधारी-विरोधक भिडले, देवेंद्र फडणवीसांचा आरोप काय?
लाडकी बहिण योजनेविरोधात काँग्रेसचा व्यक्ती कोर्टात गेल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तर याचिकाकर्त्याचा काँग्रेसशी कधीच संबंध न आल्याचा दावा नाना पटोलेंनी केलाय. काय आहे नेमका वाद आणि लाडकी बहिण योजनेवर देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात कुणाचा माणूस गेला, यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद पेटलाय. मोफतच्या योजना बंद करुन मुलभूत प्रश्नांवर पैसा खर्च करावा. यासाठी नागपूरचे रहिवाशी अनिल वडपल्लीवारांनी हायकोर्टात याचिका केलीय. यावर फडणवीसांनी आरोप केलाय की वडपल्लीवार हे काँग्रेस समर्थक असून पटोले आणि सुनिल केदारांचे निकटवर्तीय आहेत. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या दाव्यानुसार वडपल्लीवारांचा काँग्रेसशी कोणत्याही पातळीवर संबंध नसून ते काँग्रेसचे सदस्य सुद्धा नाहीत. एका माहितीनुसार अनिल वडपल्लीवार यांनी काँग्रेस आमदार सुलभा खोडकेंसोबतही काही काळ काम केल्याची माहिती आहे. मात्र त्या सुलभा खोडके लवकरच अजित पवार गटात येणार असल्याचं खुद्द अजितदादांनीच सांगितलंय. विशेष म्हणजे सुलभा खोडकेंचे पती हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. साऱ्या आरोपांवर अनिल वडपल्लीवारांशीच आम्ही संपर्क केला. त्यावर आपण आयुष्यात कुणाचेही पीए राहिलेलो नसून लवकरच साऱ्या आरोपांवर उत्तर देणार असल्याचं वडपल्लीवारांनी म्हटलंय.