शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? अद्याप सस्पेन्स; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानं चर्चा

| Updated on: Dec 04, 2024 | 4:18 PM

भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार या तीनही दिग्गज नेत्यांनी एकत्रितपणे राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. या घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तीनही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली. त्यांच्या आमदारांचीही तीच विनंती आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, तिघांची शपथ होईल. आणखी कोणाचा होणार हे आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ. कोण कोण शपथ घेणार याची माहिती संध्याकाळी देईल. गेल्या अडीच वर्षात आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतले आहे. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ही पदं तांत्रिक गोष्ट आहे. पण आम्ही यापुढेही तिघे मिळूनच निर्णय घेणार आहोत. राज्याला विकासाच्या मार्गावर नेणावर आहोत. जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यावर आमचा भर असेल, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर महायुतीच्या वतीने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली. नियमानुसार, राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा सादर केला आहे. राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंर आम्हाला 5 तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजचा शपथविधीची वेळ लिहून दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: Dec 04, 2024 04:09 PM