म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली… देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?
धारावीतील प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मागच्याचवेळी अनधिकृत बांधकाम तोडण्यात येणार होतं. पण ईदनंतर आम्हीच ते बांधकाम तोडू असं मशीद कमिटीने सांगितलं होतं. त्यामुळे तेव्हा कारवाई झाली नाही. पण ईद झाल्यानंतरही काहीच हालचाल न झाल्याने आज ही कारवाई केली जात होती, असं फडणवीस यांनी सांगितलं.
अनधिकृत बांधकामांसदर्भात न्यायालयाचे निर्णय आहेत. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात मागच्या वेळेलाही न्यायालयाने सांगितले होते. तेव्हाही बीएमसीने कारवाई सुरू केली होती. तेव्हा ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल, अशी विनंती करण्यात आली होती. आज देखील बीएमसीची टीम त्या ठिकाणी गेली होती. तेव्हा त्यांनी (मशीद कमिटी) स्वतः सांगितले की, पुढील चार-पाच दिवसात आम्ही अतिक्रमण काढतो. त्यामुळे टीम परत आली आहे. कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये. मशीद कमिटीने महापालिकेला ज्या प्रमाणे लिहून दिलंय, त्याप्रमाणे ते कार्यवाही करतील याचा विश्वास आहे, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. धारावीत मशिदीचा अनधिकृत भाग हटवण्यासाठी महापालिकेची टीम गेली होती. त्यावेळी पालिकेच्या टीमवर दगडफेक करण्यात आली. स्थानिकांनी रास्ता रोकोही केला. त्यामुळे धारावीत तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते.