महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारसोबत संवाद सुरु केला याचा आनंद: देवेंद्र फडणवीस
मोदी आणि ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली की नाही मला माहीत नाही. झाली असेल तर चांगलेच आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेलं होतं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी-ठाकरे भेटीचं स्वागत केलं. मोदी आणि ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली की नाही मला माहीत नाही. झाली असेल तर चांगलेच आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. अशा भेटीमुळे राज्याला फायदाच होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोणतंही शिष्टमंडळ जेव्हा पंतप्रधानांना भेटायलं जातं. तेव्हा शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकांतात चर्चा होत असते, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.