धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर पाण्याच्या टाकीवरून उतरले खाली
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना या प्रकरणातील ८ आरोपींवर मकोका लावण्यात आला. मात्र संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेला वाल्मिक कराड यातून सुटला.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकणात न्याय मिळावा, या मागणीसाठी संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांसह आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना या प्रकरणातील ८ आरोपींवर मकोका लावण्यात आला. मात्र संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेला वाल्मिक कराड यातून सुटला. दरम्यान, वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अशातच आज ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. यामध्ये सहभाग घेतलेल्या धनंजय देशमुख यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर खाली उडी मारू असा इशारा दिला. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासह पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनीही धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्याच्या विनवण्या केल्या मात्र ते मानण्यास तयार नव्हते. अखेर चार तास विनवणी केल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले.