Dhananjay Munde : ‘…मुली आणणार कुठून?’, मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
धनंजय मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. कारण बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा फॅक्टर प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत दिसून आला आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. परळी मतदारसंघात शरद पवारांनी मराठा कार्ड देऊन खेळी खेळली आहे. त्यामुळे परळी मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा ही लढत होतेय.
परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी तरुण मतदारांना एक अजब आश्वासन दिलं होतं. मी जर आमदार म्हणून निवडून आलो तर मतदारसंघातील सर्व मुलांचे लग्न लावून देतो. यालाच धनंजय मुंडे यांनी प्रतिउत्तर दिले होते. या मुलांचे लग्न लावून देण्यासाठी तुम्ही मुली आणणार कुठून? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. यालाच पुन्हा एकदा देशमुख यांनी मुलांचे लग्न नेमके कसे लावून देणार? याला उत्तर दिले आहे. परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांच्यात राजकीय लढत आहे. दोघांकडूनही आरोप प्रत्यारोप होत होतायत. अशातच राजेसाहेब देशमुख यांनी भर सभेत तरुणांना लग्न लावून देण्याचे अजब आश्वासन दिले. याची चर्चा संबंध राज्यभरात झाली. यालाच प्रत्युत्तर म्हणून या मुलांच्या लग्नासाठी मुली आणणार कुठून? तसेच तुमच्या जुन्या पक्षातील राष्ट्रीय नेत्याचेच लग्न झाले नाही म्हणत मुंडेंनी टीका केली होती. मात्र आता याच टीकेला राजसाहेब देशमुख यांनी इंटरेस्टिंग उत्तर दिलंय. मतदार संघातील जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिलं तर मतदार संघात उद्योगधंदे निर्माण करू त्यामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. परिणामी मुलींचे आई वडील त्या मुलाशी लग्न लावून देतील. त्यामुळे हे लग्न मीच लावून दिल्यासारखे आहे. असं उत्तर देशमुख यांनी दिले आहे. शिरसाळा येथे राजेसाहेब देशमुख यांची ग्रामस्थांनी घोड्यावर विजयी मिरवणूक काढली या दरम्यान ते बोलत होते.